नाकाबंदीत ७५० वाहनचालकांवर कारवाई; लाखोंचा दंड वसूल

ठाणे: ठाणे वाहतूक पोलिसांनी काल संध्याकाळी अचानक राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७५० वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करून लाखो रुपये दंड वसूल केला आहे.

पोलीस आयुक्त जयजित सिंग आणि सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी नाकाबंदी मोहीम राबवली होती. या मोहिमेत ४८ पोलीस अधिकारी आणि २३८ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली होती. त्या दरम्यान ११६१ दुचाकीवरून जाणाऱ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ५३९जण अडकले. ४८० चारचाकी गाड्यांची तपासणी केली असता १२०जणांनी नियम मोडल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आणि ४५४ रिक्षांची तपासणी केली असता त्यामध्ये ९१जण नियम मोडताना आढळले. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी २०९५ गाड्यांची तपासणी केली, त्यामध्ये ७५०जण अडकले. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी दिली.