मीरारोडमध्ये खळबळ
भाईंदर: मीरारोड येथील चाकूहल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यापूर्वी आयएसआयएसशी जिहाद संबंधित चिथावणीखोर नोट लिहिल्या होत्या. तसेच तो आयएसआयएसचे व्हिडिओ पाहत असल्याचेही उघड झाले. यामुळे या प्रकरणाचा तपास आता दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. चाकूहल्ला करणारा आरोपी जैब हा, मागील काही दिवसांपासून आयएसआयएसशी सबंधित अनेक व्हिडिओ बघत होता, अशीही माहिती उघड झाली आहे. आरोपी 2019 सालापर्यंत युएसमध्ये वास्तव्यास होता, त्यानंतर तो भारतात परतला. सध्या महाराष्ट्र एटीएसकडून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
मीरारोडच्या नयानगरमध्ये आरोपीने केलेला चाकुहल्ला हा एकट्याने केलेला दहशतवादी हल्लाच असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात गंभीर गोष्टी आढळल्याने तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.
आरोपी जैब जुबेर अन्सारी याने रविवारी दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला केला, मात्र त्यापूर्वी त्याने दहशतवादास पुरस्कृत करणारी नोट लिहीली होती, असे समोर आले आहे. या नोटवर आरोपीने इसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा असे शब्द लिहिल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे तर आरोपीने आणखी एका पानावर ‘आता हिंद भूमीत खरा जिहाद दिसेल’ असा आक्षेपार्ह मजकूर लिहीला होता, असेही आढळून आले आहे. त्याचबरोबर आणखी एका कागदावर आता लोन वुल्फ तुमच्यावर झडप घालतील असाही मजकूर आरोपीने लिहून ठेवल्याचे समोर आले आहे.