बदलापूर नगराध्यक्षांचा प्रवाशांसाठी स्मार्ट निर्णय
बदलापूर: कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर पडणारे पाऊल जड झाले असताना, सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांची अवस्था अधिकच बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेत, दुपारी १.३० ते ४.३० या वेळेत शहरातील सिग्नल बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे वाहनचालकांना उन्हात थांबण्याचा त्रास टळणार असून, शहरात दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत बदलापूरमध्ये उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत आहे. खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या नोंदींनुसार, परिसरात तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान असून कोकणातील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता अधिक तीव्र भासत आहे. दुपारी १२ ते ४ या कालावधीत उष्णतेचा तडाखा सर्वाधिक जाणवत असल्याने, काँक्रीटच्या रस्त्यांवर उभे राहणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीत सिग्नलवर दीड-दोन मिनिटे थांबताना अनेक दुचाकीस्वारांना चक्कर येण्याच्या घटनाही समोर येत होत्या. या वाढत्या त्रासामुळे सिग्नल बंद करण्याचा निर्णय आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १२ हून अधिक चौकांचे रूंदीकरण करून सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे या व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नागरिक आणि वाहनचालकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही आमची जबाबदारी आहे. सिग्नलवर उभे राहिल्याने त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतर दुपारच्या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना न थांबता प्रवास करता येईल, अशी माहिती नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली. दरम्यान, सिग्नल बंद असताना वाहनचालकांनी स्वयंशिस्त राखून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बदलापूरमधील हा अभिनव प्रयोग इतर शहरांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.