दोन आठवड्यांत डबलडेकर तर, दिवाळीपर्यंत दोनशे नव्या बस

ठाणे: ठाणे परिवहन उपक्रमामध्ये येत्या दिवाळीपर्यंत १०० वातानुकूलीत विद्युत, १०० सीएनजी आणि १० डबलडेकर बसगाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे, दहापैकी पहिली डबलडेकर बसगाडी येत्या दोन दिवसांत दाखल होणार असली तरी, नोंदणी प्रक्रीया उरकून ती दहा ते पंधरा दिवसांत प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत ४०७ बसगाड्या आहेत. त्यापैकी ३८० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी चालविण्यात येतात. शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली असून लोकसंख्येच्या निकषानुसार या बसगाड्यांची संख्या कमी आहे. टीएमटी बसगाड्यांना मागणी असली तरी, पुरेशा गाड्या नसल्याने अनेकजण रिक्षा तसेच इतर खासगी वाहतूकीचा पर्याय निवडतात. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून टीएमटीच्या बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

ठाणे परिवहन उपक्रमाला पीएम ई बस योजनेतून १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या मंजुर झाल्या आहेत. याशिवाय, पालिका जीसीसी तत्वावर १०० सीएनजी बसगाड्या घेणार आहे. या बसगाड्या येत्या दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. याशिवाय, पालिका दहा डबलडेकर बसगाड्या खरेदी करणार असून त्यापैकी पहिली बस येत्या दोन दिवसांत टीएमटीला उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागाची नोंदणी प्रक्रीया उरकून दहा ते पंधरा दिवसांत प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होणार आहे. ही बस कोणत्या मार्गावर चालवायची हे निश्चित झाले नसले तरी, ती घोडबंदर ते ठाणे या मार्गावर चालविली जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

पुणे येथील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, १ लाख लोकसंख्येस ५० बसगाड्या असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाख इतकी असून शहरास १३५० बसगाड्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बसगाड्या असून त्यापैकी ३८१ बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वर्षभरात टीएमटीच्या ताफ्यात ३७० नवीन बसगाड्या दाखल होणार असून यात पीएम ई बस योजनेतून १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १५ व्या वित्त आयोगातून १६० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १०० सीएनजी, १० डबलडेकर बसगाड्यांचा समावेश आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या ७७७ इतकी होणार आहे.

येत्या दिवाळीपर्यंत १०० वातानुकूलीत विद्युत, १०० सीएनजी आणि १० डबलडेकर बसगाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून दहापैकी पहिली डबलडेकर बसगाडी येत्या दोन दिवसांत दाखल होणार आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.