महिला विशेष सरकारी वकीलावर आरोपीचा भर कोर्टात हल्ला

ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच संतप्त झालेल्या आरोपीने महिला विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

सुरेंद्र तिंबल राम (६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोस्को विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही वीरकर यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यामध्ये आई आणि मुली फितूर झाल्या होत्या, परंतु उलट तपासणीमध्ये सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध होईल असा युक्तिवाद केला होता. त्या खटल्याचा आज सकाळी १०.४५च्या दरम्यान न्यायालय निकाल देणार होते. त्यासाठी आरोपी सुरेंद्र राम याला न्यायालयात हजर केले होते. न्यायमूर्ती व्ही व्ही वीरकर यांनी ११.४५च्या दरम्यान आरोपीला दुहेरी जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली, त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने खटल्यातील सरकारी वकील रेखा हिवराळे यांच्या उजव्या खांद्यावर जोरात बुक्का मारला. अचानक झालेल्या हल्ल्याने हिवराळे यांचा रक्तदाब वाढला. त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आले.

याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.