शिर्डीला निघालेल्या दाम्पत्याचा भिवंडीत अपघाती मृत्यू

सहा वर्षाची चिमुकली आश्चर्यकारकरीत्या बचावली

भिवंडी : मुंबई-भांडुप येथून दुचाकीवरून आज सकाळी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाकरीता निघालेल्या दाम्पत्याचा मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील सहा वर्षाची चिमुकली मृण्मयी आश्चर्यकारकरित्या बचावली असून ती सुखरूप आहे.

मनोज जोशी (३६) आणि मानसी जोशी (३४) असे मयत दाम्पत्याचे नाव असून ते तानाजी वाडी, टेंभीपाडा भांडुप पश्चिम येथे रहात होते. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत शिर्डी येथील साईदर्शनाने करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्यासोबत भांडुप पश्चिम येथील तानाजीवाडी चाळीतील रहिवासी काही दुचाकीवर तर काही मिनी बसने शिर्डी येथे जाण्याकरता आज सकाळी साडेसात वाजता निघाले. या चाळीतील मनोज जोशी व त्यांची पत्नी मानसी व मुलगी मृण्मयी असे तिघे मोटर सायकलने शिर्डी दर्शनाकरता निघाले होते. भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-नाशिक महामार्गावर येवई ते वडपा या दरम्यान आले असता नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरच्या (एमएच-४३ वाय ८४९७) चालकाने भरधाव बेजबाबदारपणे कंटेनर चालवून दुचाकीस मागून धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील जोशी दाम्पत्य कंटेनरच्या मागील चाकात आले आणि घटनास्थळीच त्यांचा अंत झाला. परंतु त्याचवेळी त्यांची सहा वर्षाची चिमुकली मृण्मयी ही गाडीवरून विरुद्ध दिशेला पडल्यामुळे तिला कोणतीही दुखापत न होता ती आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.


या घटनेनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी कंटेनरचालक कपिल राजाराम देव यास ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय आयजीएम रुग्णालयात रवाना केले. मनोज जोशी यांच्यासोबत निघालेला शेजारी विक्रांत पायरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे करीत असून या अपघाती घटनेनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.