वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांना वेग

अतिरिक्त आयुक्तांचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना निर्देश

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची काम प्रगतीपथावर असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अमंलबजावणी होण्यासाठी आज महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेवून सर्व कामे वेळेतच पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित ठेकेदारांना दिले.

ठाणे शहरातील पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत ३.३६ हेक्टर क्षेत्रात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कोलशेत वॉटर फ्रंट, साकेत-बाळकुम वॉटरफ्रंट, रेतीबंदर पारसिक, नागला बंदर तसेच कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाचा महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल तसेच इतर अधिकारी, संबंधित ठेकेदार आदी उपस्थित होते.

यामध्ये सुशोभीकरण, संरक्षण भिंती, पर्यावरणभिमुख गॅबियन भिंती, पाथवे, वृक्षारोपण करणे, पार्किंग परिसर, सायकल ट्रॅक, हर्बल कॉर्नर, अँम्पी थेटर तसेच शौचालयाच्या सर्व कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून इतर उद्यान विषयक इतर कामे तसेच बांधकामविषयक सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित ठेकेदारास दिले.