सव्वा कोटींचे दागिने घेऊन फरार कर्मचाऱ्यास अटक

पोलिसांनी वेषांतर करून माउंट अबुच्या जंगलात आवळल्या मुसक्या

ठाणे : ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील एक कोटी 30 लाखांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबु पर्वताच्या जंगलातून अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी एक कोटी 26 लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशालसिंग राजपूत (29) हा दुकानातील एक कोटी 30 लाख 14 हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले. तसेच त्याच्या मूळ गावाचे नाव, पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेले आधारकार्ड व इतर दस्तावेज काढून सोबत घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या.

घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीने पळून जातांना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचे व तो वसईरोडकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान, आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबु येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून 2024 रोजी मिळाली. नौपाडा पोलिसांचे एक पथक त्वरित माउंट आबु येथे रवाना झाले. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींची चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली. आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक कोटी 26 लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.