कळवा, मुंब्रा, माजिवडे-मानपाडा प्रभागात अनधिकृत बांधकामे जोरात
ठाणे : अनधिकृत बांधकामप्रकरणी दिवा येथील सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आले असले तरी कळवा, मुंब्रा आणि माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीतील प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना मात्र अभय दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.
भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी १० दिवसांचा अल्टीमेटम महापालिका प्रशासनाला दिला होता, त्यामुळेच कारवाईचा देखावा करत दिवा येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांना मागील शुक्रवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान कळवा येथील सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याविरोधात २० लाख रुपये घेऊन आठ आठ मजली इमारतींना अभय दिल्याचा जाहीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तर मुंब्रा येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. माजीवडे-मानपाडा आणि वर्तकनगर येथील येऊर भागात अनधिकृत बांधकामांना मदत करणारे अधिकारी-कर्मचारी मात्र मोकाट सोडल्याबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कळवा येथे सध्या २९ अनधिकृत इमारतींची कामे सुरू आहेत. सहा-सहा महिन्यात आठ-आठ मजली इमारती उभ्या राहत आहेत. मुंब्रा येथेही तशीच परिस्थिती आहे. वर्तकनगर आणि माजीवडे-मानपाडा येथे अधिकारी आणि भू माफिया यांच्या अभद्र युतीमुळे बेकायदा इमारती, गाळे आणि चाळी उभ्या राहत आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी म्हणून तेथील अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही का? असा प्रश्न महापालिकेतील अधिकाऱ्यांना पडला आहे. एकूणच या कारवाईबाबत स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे
महापालिका प्रशासनाने सर्वांना समान न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. दिवा येथील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात आली आहे, तशीच कारवाई इतर प्रभागात करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.