कळव्यातील मैदानाला टाळे; स्थानिक खेळाडूंची कुचंबणा

मुलांच्या पालकांसह आमरण उपोषण करणार आ.जितेंद्र आव्हाड

ठाणे: शहरातील खेळाची मैदाने एकीकडे नष्ट होत असताना दुसरीकडे कळव्यातील मुलांकरिता असलेल्या क्रिकेट मैदानाला टाळे ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणती मर्दूमकी दाखवली? या मैदानावर खेळण्यासाठी मुलांना मनाई केली तर त्यांच्या पालकांसाह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

यावेळी श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची सुपारी अजित पवार यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघातील कळवा येथील खारभूमी मैदानासंदर्भात आव्हाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीच आपल्या मतदार संघातील खारभूमी मैदानाला टाळे ठोकण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप करत पवार यांच्यावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले, गेली दहा-बारा वर्षे कचऱ्यात असलेले हे मैदान आम्ही खेळण्यासाठी बनवले. या ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आणि लहान मुले क्रिकेटच्या सरावासाठी या ठिकाणी येत असतात. चांगले खेळाडू या मैदानात घडले, हे मैदान कोणत्याही पक्षाचे नाही मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून खेळायच्या मैदानाला टाळे लावा असा दम दिला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने या मैदानामध्ये कार्यक्रम केला, इतर राजकीय कार्यक्रमही या ठिकाणी झाले, त्यात कोणीही हस्तक्षेप केला नाही. मग अजित पवार यांनी हा आदेश का दिला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. लहान मुलांचे मैदान बंद करुन तुम्ही कोणती मर्दुमकी गाजवू पाहत आहात? तुम्ही कळव्याच्या जनतेच्या मनातून उतरले आहात अशी टीकाही आव्हाड यांनी यावेळी केली.

जितेंद्र आव्हाड एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी अजित पवार यांचा गंभीर शब्दात समाचार घेतला. दादा, हात जोडून विनंती करतो, छोट्या-मोठ्या राजकारणात पडू नका. हे धंदे बंद करा. मला तुम्हाला पाडायचं आहे, त्याकरिता मला निधी दिला जात नाही. माझ्या विरोधात केस केली जाते. त्याचा मी सामना करेन मात्र तुम्ही अशा प्रकारे मला पाडण्याचा प्रयत्न कराल तर ते शक्य नाही. इथून कोणाला आमदार व्हायचे आहे त्यांनी जरूर व्हा, पण मैदानाबाबत राजकारण नको. तुम्ही नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून पुढे जाऊ शकता, मला लाज वाटते मी काही वर्ष तुमच्यासोबत काम केले, अशा शब्दात त्यांनी पवार यांच्यावर टीका केली.

या मैदानाला टाळे लावायचे असेल तर बाजूला 72 एकर जमीन आहे, त्याला टाळे लावा. ती जमिन इंच-इंच खाल्ली जात आहे, तुम्ही नेहमी सांगता मी विकासाचे राजकारण करतो, मग या मुलांचा विकास नको आहे का? माझ्या रागापोटी आणि येथील चमच्यांसाठी हे केले जात आहे. लहान मुलांचे शाप वाईट असतात. तुमच्या बालिश उमेदवारांच्या नादी लागु नका, असा टोलाही आव्हाड यांनी यावेळी लगावला.

या मैदानावर मुलांना खेळण्यास मनाई केली तर मैदानात मुलांच्या आई-वडिलांसह आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.