ठाण्यात भाजपकडून स्वबळाचा नारा
ठाणे: काल बुधवारी आनंद आश्रम इथे खासदार नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला. तर आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही ‘अबकी बार 70 पार’, ‘महापौर भाजपचाच होणार’, असा नारा देण्यात आला.
ठाणे भाजपाच्या 18 मंडळातून 416 इच्छुकांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. या बैठकीत ‘अबकी बार 70 पार’, ‘महापौर भाजपचाच होणार’अशी भूमिका भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली. निवडणूक पूर्वतयारी अभ्यास वर्गाच्या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या इच्छुक उमेदवार कार्यशाळेत भाजपची स्वबळाची तयारी सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपच्या देखील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
एकटे लढलो तर आमचा महापौर बसावा अशी इच्छा आहे आणि ठाणेकर अम्हालाच साथ देतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी ‘ठाणेवैभव’ शी बोलताना दिली. तसेच प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार करतात, निर्ढावतात, कारण त्यांच्या मागे नक्कीच कोणीतरी असते, कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय ते भ्रष्टाचार करणार नाहीत, अशी संजय केळकर यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
भाजपाची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढली आहे. सर्वात जास्त आमदार भाजपाचेच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा हक्क आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची वेळ येते तेव्हा आम्ही तिथेच जातो. तिथे कुणाची जहागिरी नसते. जनतेने यावेळी योग्य ते ठरवलेले दिसणार आहे. कुणाची उंची किती याचे उत्तरही योग्य वेळेला देऊ. असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.