नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत आहे. तसेच नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत.
एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षाआधी महामंडळाने बदल केला आहे. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली. पण ही प्रणाली सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट होत असल्याचे दिसत आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावर आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
कर्मचाऱ्यांना मेमो देणे, मशीन इश्यु करणे यासाठी आधी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढतांना एक कागद लागत होता. आता एकाच मेमोची प्रिंट घेण्यासाठी तीन कागद लागतात. त्यामुळे महामंडळाचा खर्चही वाढल्याचे दिसून येत आहे.
काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आधीची आरक्षण प्रणाली ही खूप छान आणि सोयीस्कर होती. पण आता जी आरक्षण प्रणाली आहे ती अतिशय अवघड आणि खूप किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या आरक्षण प्रणालीवर काम करताना खूप त्रास होत आहे.