भाजपासोबत युती नको; ठाण्यात शिंदे गटाचा सूर

विकासकामांत भाजपचा अडथळा, बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप

ठाणे: राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची महायुती असली तरी ठाण्यात मात्र आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. भाजपचे पदाधिकारी विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप करून शिंदे सेनेने ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील काही महिन्यांपासून घेतलेल्या भूमिकेबाबत खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री आनंद आश्रम येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका हद्दीतील विकास कामामध्ये भाजपचे पदाधिकारी अडथळा निर्माण करत आहेत. अनेक नागरी सुविधांच्या कामाबाबत तक्रार केली जात आहे. काही कार्यकर्ते माहिती अधिकारात माहिती मागून कामात अडथळा निर्माण करत आहेत. त्यांना भाजपचे वरिष्ठ नेते कोणत्याही प्रकारचे वेसण घालत नाहीत. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केले जात असल्याने आगामी महापालिका निवडणूक एकट्याने लढवून भाजपाला त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर युती करू नये अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली, परंतु खा. शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रमुख पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. युती करायची कि नाही याचा निर्णय पक्षाचे प्रमुख नेते श्री.शिंदे हे घेणार असून तुमच्या सर्वांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचविल्या जातील, असे आश्वासन खा.श्री.म्हस्के यांनी यावेळी दिले.

भाजपचे आमदार संजय केळकर यांनी काल ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या आहेत तर वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत त्यामुळे या दोन पक्षात महायुती होईल किंवा नाही याची राजकीय वर्तुळात संक्षता व्यक्त केली जात आहे.