रील बनवण्याच्या नादात तरुणाने लावली चर्चमध्येच आग

वसई किल्ल्यातील प्रकार

वसई: हल्ली इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी भन्नाट आयडिया वापरतात. रील्स बनवण्याच्या नादात विचित्र गोष्टी केल्याने ही मुले अडचणीत सापडतात. असाच एक प्रकार मुंबईजवळच्या वसईच्या किल्ल्यावर पाहायला मिळाला आहे.

वसई किल्ल्यावर आलेल्या एका हौशी पर्यटकाने इंस्टाग्राम रील बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील एका चर्चमध्ये आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमी करत आहेत. काही दुर्गप्रेमींनी याप्रकरणी पुरातत्व विभागाकडे तक्रार केली असून या तरुणावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

या किल्ल्यात फ्रान्सिस्कन हे ऐतिहासिक चर्च आहे. हे चर्च तब्बल ५०० ते ६०० वर्ष जुने आहे. एक तरुण येथे आला आणि त्याने इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी या चर्चमधील एका शिलालेखावर एक आकृती काढली. त्या आकृतीवर त्याने ज्वलनशील द्रव्य टाकून आग लावली. त्यानंतर तो व्हिडीओ चित्री करत होता. या दुर्गप्रेमी तरुणाने सांगितले की, किल्ल्यात आग लावणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही पुरातत्व विभागाशी संपर्क साधला. परंतु आम्हाला त्यांच्याकडून समाधानकरक उत्तर मिळाले नाही. दरम्यान, किल्ल्यात आग लावणाऱ्या तरूणावर कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.