दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाचा भातसा नदीत बुडून मृत्यू

संग्रहित

शहापूर : शहापूर तालुक्यातील कळमगाव येथील एका युवकाचा भातसा नदीत दोन सहकारी मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कळमगाव येथील सूरज अशोक ठाकरे या तीस वर्ष वयाचा युवक आपल्या सहकार्यांसोबत भातसा धरणाखालील नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोन अल्पवयीन सहकारी मुले पॉवर हाऊसच्या धारेजवळ पोहत असताना बुडताना सुरजच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने तत्परता दाखवून त्या दोन्ही मुलांना बुडतांना वाचविण्यात यश मिळविले परंतु दुर्दैवाने पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने सूरजचा बुडून मृत्यू झाला. जीवावर उदार होऊन दोन मुलांना वाचविणाऱ्या सूरजने आपला जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.