रेल्वे मार्गात हेडफोन शोधताना एका तरूणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

डोंबिवली: कल्याण ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल मधून प्रवास करणाऱ्या दोन तरूणांपैकी एका तरूणाचा हेडफोन डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गात पडला. या तरूणांनी कोपर रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे मार्गात हेडफोन शोधण्याचा प्रयत्न केला. रेल्वे मार्गात हेडफोन शोधण्यात मग्न असलेल्या तरूणांना समोरून लोकल आल्याचे समजले नाही. लोकलच्या धडकेत एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला, एक जण जखमी झाला.
हे तरूण मुंब्रा येथील रहिवासी आहेत. ते कल्याण जवळील मलंग गडावर दर्शनासाठी गेले होते. अहमदराजा शेख (१६) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा सोबती सादिक शेख (१७) गंभीर जखमी झाला आहे. मुंब्रा येथील चार जण मलंगगडावर दर्शनासाठी गेले होते. कल्याण रेल्वे स्थानकातून त्यांनी मुंब्रा येथे जाणारी धीमी लोकल पकडली. चारही जण लोकल दरवाज्यात उभे राहून प्रवास करत होते.
डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर अहमदराजा याचा हेडफोन रेल्वे मार्गात पडला. चारही तरूण अस्वस्थ झाले. अहमदराजा, सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे मार्गातून हेडफोन शोधण्यासाठी डोंबिवली स्थानकाच्या दिशेने चालू लागले. दोन तरूण पुढे निघून गेले. रेल्वे मार्गातून चालत हेडफोन शोधण्यात मग्न असताना दोघांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा आवाज आला नाही. मोटरमनने भोंगा वाजवूनही दोघांच्या तो लक्षात आला नाही. काही कळण्याच्या आत अहमदराजाला लोकलचा जोरदार फटका बसला तो जागीच मरण पावला. सादिकला फटका बसला. तो रेल्वे मार्गाच्या बाजुला फेकला गेला. तो थोडक्यात बचावला. तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दोघांच्या मुंब्रा येथील नातेवाईकांना दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.