इंग्रजीतून बोलल्यामुळे महिलेला भररस्त्यात मारहाण

डोंबिवली : जुनी डोंबिवली पश्चिममध्ये इंग्रजी शब्दावरून मराठी-उत्तर भारतीय वाद चिघळल्याची घटना समोर आली आहे. एक्स्क्युज मी असं बोलल्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात मारहाण झाली.

विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी तक्रारी नोंदवत तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम गुप्ता या महिला त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत घराकडे परतत होत्या. त्याच दरम्यान, बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर काही लोक उभे होते. त्या लोकांना वाट करून देण्यासाठी पुनम यांनी एक्स्क्युज मी असे इंग्रजीत म्हटले. मात्र या साध्या वाक्यावरून तिथे उभे असलेल्या अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब ढबाले यांचा संताप अनावर झाला. या तिघांनी “इंग्रजी नको, मराठीत बोला” असे म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, गोंधळ ऐकून मदतीला आलेले पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पुनम यांच्या नाकातील फुलीसुद्धा तुटली असून, त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान झाले आहे.

या प्रकाराचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.