नवी मुंबई : उरण-नेरुळ रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला उरणवरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती. मात्र, बामणडोंगरी रेल्वे स्थानक येताच या महिलेची प्रसूती झाली.
झाकीया मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव आहे. लोकल ट्रेनच्या डब्ब्यातच महिलेची प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी शेजारील महिला डब्ब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलाविण्यात आले होते.
या घटनेची माहिती मोटारमनने रेल्वे पोलिसांना दिली. माहिती मिळताच तत्काळ नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती. या महिलेला आणि नवजात बाळाला तत्काळ नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माता आणि बालक या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
उरण परिसरातील रहिवासी झाकिया मेहबूब सय्यद ही महिला प्रसुतीसाठी नेरुळला मनपा रुग्णालयात जात होती. सकाळी ती उरण-नेरळ लोकल ट्रेनमध्ये असताना ट्रेन नेरूळ स्थानकावर येताच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. डब्ब्यातच तिची प्रसुती देखील झाली, अशी माहिती शासकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटरे यांनी दिली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्परतेने मदत केली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांचे कौतुक होत आहे. ही महिला आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे. यानंतर तीन महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिला रुग्णवाहिकेद्वारे नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात नेण्यात मदत केली.