दोन ठार, एक जखमी
शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात एक ट्रक 400 फूट खोल दरीत कोसळून त्यात दोन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. हा ट्रक खाली असलेल्या हिवाळा ब्रिज या रेल्वे पूलाच्या रेल्वे ट्रॅकवर पडला नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
आज (गुरुवार) पहाटे 2 च्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक कसारा घाटात भरधाव वेगात नागमोडी वळण घेत असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि आयशर ट्रक दरीत कोसळला. सुमारे 400 फुट खोल दरीत ट्रक रात्रीच्या अंधारात कोसळल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, जस्विन्दर् सिंग, स्वप्नील कळत्री यांनी आणि कसारा पोलीस ठाण्याचे विनोद खादे, महामार्गचे पोलीस उप निरीक्षक पवार यांनी दरीत पडलेल्या ट्रकमधील गणेश दुशिंग (22) याचा मृतदेह रात्री दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दरीतून वर आणला परंतु अजून दोन बेपत्ता असल्याची माहिती ट्रक ट्रान्सपोर्टच्या मालकाकडून मिळाली. पुन्हा सकाळी 6.45 ला आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांनी पोलीस मित्र तसेच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश तडवी, पोलीस उप निरीक्षक सागर जाधव, दीपक कुशारे, महामार्गचे पोलीस उप निरीक्षक माधव पवार यांच्या मदतीने दरीत शोध घेतला. त्यावेळी एका झाडाच्या झुडपात राहुल जाधव (24) या तरुणाचा मृतदेह मिळून आला. दरीतील ट्रकलगत पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह नरेंद्र महाराज रुग्णवाहीका आणि राष्ट्रीय महामार्गच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णाल्यात पाठवले. त्यानंतर दरीत बेपत्ता चालकाचा शोध सुरु केला.
ट्रक चालकाने अपघात होत असल्याचे पाहून ट्रकमधून उडी मारून पलायन केल्याचे समजले. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता शोध मोहीम थांबवली. काही वेळाने ट्रकचा चालक जखमी अवस्थेत कसारा पोलीस ठाण्यात जमा झाल्यानंतर अपघात कसा झाला याबाबतची माहिती मिळाली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेत निकृष्ट दर्जाच्या संरक्षक भिंतीमुळे ट्रक थेट दरीत कोसळल्याचे दिसून आले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाच्या खाली मुंबईहून नाशिकसह लांब पल्ल्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा लोहमार्ग आहे. घाटाच्या खाली लोहमार्गांवरील ब्रिटिशकालीन हिवाळा ब्रिज आहे. या हिवाळा ब्रिजवरून दररोज दिवस-रात्र रेल्वे सेवा सुरु असते. वरील घाटावर महामार्ग आणि खाली रेल्वे मार्ग असलेल्या या कसारा घाटात अपघातग्रस्त ट्रक 25 ते 30 फूट अलीकडे कोसळला असता तर तो ट्रक हिवाळा ब्रिजवर आणि ब्रिजलगत असलेल्या सुरक्षा चौकीवर पडला असता. ट्रक ब्रिजवर कोसळला असता तर चौकीत असलेल्या पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाली असतीच पण हिवाळा ब्रिजवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद पडली असती.
जर या दरम्यान एखादी मेल एक्सप्रेस नाशिक दिशेने जात असती तर मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधकाम करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महामार्ग ठेकेदार व पोट ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अपघातांतील मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे.