मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर झाड कोसळले

पालिकेच्या गाडीचे किरकोळ नुकसान

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सर्व्हिस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेचे जवळ जवळ सर्वच अधिकारी बंगल्यावर गेले असतांना घटनेची माहिती मिळताच येथील वृक्ष हटविण्यात येऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी सव्र्हीस रोडच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे खोदकामही करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील वृक्षाची मुळे देखील बाहेर आली होती. त्यात सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे वृक्षाच्या आजूबाजूची जमीन देखील भुसभुशीत झाली होती. त्यामुळेच हे वृक्ष पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान हे वृक्ष बाजूला असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने पोल देखील खाली वाकला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. परंतु हे वृक्ष महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या गाडीवर काही प्रमाणात पडल्याचे दिसून आले. परंतु पोल मध्ये असल्याने गाडीचे फारसे नुकसान झाले नाही.