कल्याण : ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते तीच यथार्थ भक्ती होय’’ असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी वर्चुअल माध्यमातून सहभागी झालेल्या जगभरातील लाखो भाविक भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले.
भक्तीची परिभाषा समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले की, भक्ती हे दिखाव्याचे नाव नसून ती तर ईश्वराच्या प्रति आपला स्नेहभाव प्रकट करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये भक्त आपल्या अंगी असलेल्या गीत, नृत्य, कविता आदि माध्यमातून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी सदैव तत्पर असतो.
सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी प्रतिपादन केले, की वास्तविक भक्ती ही कोणत्याही भौतिक उपलब्धिसाठी केली जात नाही. परमात्म्याच्या प्रति निरपेक्ष भावनेने केलेली भक्ती खऱ्या अर्थाने ‘प्रेमाभक्ती’ होय. हा एक ओतप्रोत मामला असतो ज्यामध्ये भक्त आणि भगवंत एकमेकांशी संलग्न राहतात. भक्त आणि भगवंत यांच्यातील अतूट संबंधाविना भक्ती होऊ शकत नाही.
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. रॅलीमध्ये सेवादल स्वयंसेवकांनी पी.टी.परेड, शारीरिक व्यायाम तसेच मल्लखांब, मानवी मनोरे, दोरी उड्या यांसारखे अनेक पारंपारिक खेळ सादर केले. याशिवाय मिशनची विचारधारा व सद्गुरुंच्या शिकवणूकीवर आधारित विविध लघुनाटिकाही प्रस्तुत केल्या.
सेवादल रॅलीला आपले आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करत मर्यादित संख्येने सहभागी होऊन सेवादल स्वयंसेवकांनी रॅलीमध्ये केलेल्या सुंदर प्रदर्शनाबद्दल त्यांचे कौतुक केले.