विकास प्रकल्प हजार; कासवगतीने ठाणे बेजार

ठामपा समन्वयासाठी नेमणार नोडल सल्लागार

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्राधिकारणांकडून तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रकल्पांची कामे समन्वयाच्या अभावामुळे कासव गतीने सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. परिणामी जनजीवनही विस्कळीत होत असते. अखेर या कामांना गती देण्यासाठी नोडल सल्लागाराची नियुक्ती करण्याची वेळ ठाणे महापालकेवर आली आहे.

एमएमआरडी क्षेत्रात ठाणे महापालिकेचा देखील समावेश होतो. मुंबईला इतर शहरांशी तसेच राज्यांना जोडणारे रस्ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधून जात असून ठाणे महापालिका क्षेत्रात विविध एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्राकडील इतर विभागांकडून अनेक मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली आहेत. एकाच वेळी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असल्याने अद्याप कोणत्याच प्रकल्पाला हवी तशी गती मिळू शकलेली नाही. विविध प्राधिकरणांच्या असमन्वयामुळे या प्रकल्पांना गती मिळू शकलेली नाही, त्यामुळे त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.
नुकत्याच झलेल्या एका बैठकीत विविध विभागांकडे समन्वय साधून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नोडल सल्लागाराची नेमणूक लवकरात लवकर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिका, एमएमआरडीए तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत त्यांच्या स्तरावर कामनिहाय स्वतंत्र सल्लागारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच काही कामांसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या सर्वांशी ठाणे महापालिकेकडून समन्वय साधण्यासाठी नोडल सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नोडल सल्लागार नियुक्ती, तांत्रिक मनुष्यबळ तसेच त्यांचे महिन्यामधील लागणारे सेवेचे दिवस गृहित धरून त्यानुसार ढोबळ अंदाजखर्च तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या कामी एक वर्ष कालावधीसाठी एकूण ९६ लाख ४१ हजार एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
या प्रकल्पांसाठी साधणार समन्वय

घोडबंदर सेवा रस्न्यांचे मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरण ठाणे महानगरपालिकेमधील पीपीपी तत्त्वावरील प्रोजेक्ट ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन ५ जेट्टी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट ठाणे इंटरनल रिंग मेट्रो कोस्टल रोड घोडबंदर रोड नविन फ्लायओव्हर ऐरोली – काटई रस्ता कोलशेत व मोघरपाडा खाडी ब्रीज आनंदनगर – साकेत फ्लायओव्हर सॅटीस पूर्व प्रकल्प – २ वडाळा ते गायमुख मेट्रो लाइन -४ इस्टर्न फ्री वे विस्तारीकरण ठाणे – बोरावली टनेल बुलेट ट्रेन शीळ – मानकोली रस्ता शीळ फ्लायओव्हर व कल्याण फाटा अंडर पास फुटहील रोड अमृत – २, वॉटर सप्लाय व ड्रेनेज बोरीवडे स्पोर्ट्स कॉम्पलेक्स कोपरी ते खारेगांव कोस्टल रोड नं. २ प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प नविन ठाणे रेल्वे स्टेशन (मेंटल हॉस्पिटल) कळवा-पटनी फ्लायओव्हर ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागाकडील प्रकल्प पॉड टॅक्सी प्रकल्प महापालिका भवन नविन इमारत ठाणे रेल्वे स्टेशन नुतनीकरण कोपरी-पटनी खाडी पूल ठाणे वडपे – ८ मार्गिका नोडल सल्लागारांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व प्राधिकरणासोबत समन्वय साधला जाणार आहे. त्यासाठी ठाणे पालिकेने जवळपास एक कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.