पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग

बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले

ठाणे: मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला बुधवारी सांयकाळी आग लागली. काही वेळातच ही आग वाढल्याने बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आले.

बुधवारी सांयकाळी ५च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई सोसायटी, बिल्डिंग नंबर- ९, अमृतांगण, पारसिक नगर, खारेगाव येथील ओम साई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेल्या भंगार साहित्य व कचऱ्याला आग लागली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तत्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ठाणे महापालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी – ०१ बस वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान चार फायर वाहने, चार वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहनासह हजर झाले. या आगीमुळे जवळच असलेल्या ओम साई सोसायटी (इमारत तळ+७ मजली) या इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारती बाहेर काढण्यात आले. आगीमुळे इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.