ठाणे : ठाणे शहरात मागील काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याची गांभीर्याने दखल घेत, पालिकेने श्वान मित्रांचे पथक तयार केले आहे. हे पथक पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण आणणे, निर्बिजीकरणासाठी मदत करणे अशी कामे करणार आहे.
शहरातील १६ श्वान मित्रांची बैठक गुरुवारी पालिकेत पार पडली. त्यानंतर आता या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जाणार असून लवकरच तो आयुक्तांना सादर केला जाणार आहे. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत मागील काही महिन्यांपासून वाढल्याचे दिसत आहे. पालिकेकडे असलेल्या अपुऱ्या साहित्य सामुग्रीमुळे पालिकेला देखील या कुत्र्यांवर आळा बसविणे कठीण झाले आहे. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी घेतली. त्यानुसार यावर तोडगा काढण्याच्या सुचना त्यांनी संबधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागान श्वान मित्रांची मदत घेण्याची तयारी केली आहे. भटक्या कुत्र्यांसाठी श्वान मित्रांनी पुढे यावे असे आवाहनही पालिकेने केले होते. त्याला प्रतिसाद देत १६ श्वान मित्र पुढे आले आहेत. त्यांची बैठक गुरुवारी उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत श्वान मित्रांचे नेमके काम काय असेल याची कल्पना त्यांना देण्यात आली. त्यानुसार निर्बिजीकरणासाठी मदत करणे, श्वान मित्रांकडून त्यांच्या प्रभागातील श्वानांची माहिती गोळा करणे, पिसाळलेल्या श्वानाला नियंत्रणात आणण्यास देखील मदत घेतली जाणार आहे.
या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जाणार असून तो आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. श्वान मित्रांना यासाठी कोणत्याही स्वरुपाचे मानधन दिले जाणार नाही. परंतु त्यांनी या माध्यमातून महापालिकेस सहकार्य करावे, अशी या मागची कल्पना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.