ठाण्यात हिट अँड रनची घटना
ठाणे : हिट अँड रनच्या घटनांमुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रनच्या घटनेत एका आलिशान मर्सिडीज गाडीने २१ वर्षीय बाईकस्वाराला चिरडले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळच ही घटना घडली असून यातील आरोपी फरार आहे.
अपघाताच्या वेळी कारची रेस सुरु होती तसेच कार चालवणाऱ्याने मद्य प्राशन केले होते असा आरोप अपघातातील मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर ठाण्यात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दर्शन हेगडे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळमध्ये राहत होता. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नितीन जंक्शन या ठिकाणी दर्शन आपल्या मोटरसायकलवरून चायनीज आणण्यासाठी वागळे येथे जाऊन घरी परत जात असताना नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईकडे जाणाऱ्या आलिशान मर्सिडीजने (एमएच ०२ बी के १२००) भरधाव वेगाने दर्शनच्या बाईकला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती कि दर्शन जागेवरच मरण पावला. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून तो अद्याप फरार आहे.
या प्रकरणात फिर्यादी दिशीत ठक्कर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस स्टेशनकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत या घटनेत मृत झालेल्या दर्शनचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कारची रेस लावण्यात आली होती. कार चालवणाऱ्यांनी मद्यप्राशन देखील केले होते. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. नंबर प्लेट जागेवर मिळून आली तरी आरोपीला अटक केली जात नसल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मृताच्या भावाने सांगितले.