चालक-प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारून वाचवले जीव
ठाणे: चालत्या चारचाकीला आग लागल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात शनिवारी रात्री घडली आहे.
या कारमध्ये चालक आणि दोन प्रवासी प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत चालक आणि प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या घेऊन आपला जीव वाचवला. भर रस्त्यात या कारने पेट घेतल्यामुळे मुंबईकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक मात्र काही प्रमाणात मंदावली होती.
मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी येथून चालक सय्यद मोहम्मद दोन प्रवाशांसह मुंब्र्याच्या दिशेने निघाले होते. तीन हात नाका उड्डाणपूल उतरल्यानंतर कालिका माता मंदिर जवळ अचानक मोहम्मद यांच्या गाडीने पेट घेतला. त्यावेळी प्रसंगावधान राखत त्यांच्यासह दोघांनी गाडीबाहेर धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.