उल्हासनगरात मालमत्ता कराची 107 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

उल्हासनगर : यापूर्वी लावण्यात आलेल्या सात अभययोजनेतील सर्व वसुलीचे रेकॉर्ड मोडले असून  उल्हासनगर पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या महिला अधिकारी उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या टीमने 107 कोटींची रेकॉर्डब्रेक वसूली केली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत अभययोजना सुरू राहणार असल्याने या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

15 मार्चपर्यंत उपायुक्त प्रियंका राजपूत यांची टीम ऑन द फिल्ड उतरल्याने आणि 64 हजार करबुडव्यांना वॉरंट बजावण्यात आल्याने 57 कोटी वसुलीची दमदार सुरुवात केली होती.त्यात भर पडावी म्हणून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी अभययोजना लागू करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेत मांडल्यावर तो पास झाला होता.मात्र आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी तो विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवला होता.तेंव्हा नगरसेवक अरुण आशान यांनी व्यापाऱ्यांसोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अभययोजने बाबत साकडे घातले होते.त्यानुसार डॉ.शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरात 16 ते 31 मार्च पर्यंत अभययोजना सुरू झाली होती. या योजनेसाठी मालमत्ता कर विभाग व नागरी सुविधा केंद्र प्रथम रात्री 8 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 29 ते 31 मार्च च्या रात्री 12 वाजेपर्यंत ऑन-ड्युटी सुरू ठेवण्यात आला होता.

उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कर निर्धारक व संकलक जेठाचंद करमचंदानी, उपकर निर्धारक व संकलक उद्धव लुल्ला, मनोज गोकलानी, कर निरीक्षक गणेश शिंदे, राम आयलानी, उषा मौळे, किशोर आईलसिंघानी, सुखदेव भंबानी, सुरेश नागदेव,नारायण कुडीया,दयाराम डोबाळे, भानू परमार, सुंदर लांडगे, लिपिक अनिल पहुजा, वैशाली चौधरी, शंकर आहिरे, मिनाक्षी जोशी, गौरी पिंपळे, लक्ष्मण कांबळी, कल्पना साळवे, वनिता डगळे, विशाल बांगर, दीपक गायकवाड या टीमसोबत नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी ही टीम सुट्यांच्या दिवशीही ऑन-ड्यूटी राहिली.

अभययोजनेतील सर्व रेकॉर्ड झाले इतिहासजमा

उल्हासनगरात सातवेळा अभययोजना राबवण्यात आली आहे. आज 107 कोटींच्या आसपास वसूली झाली आहे. त्यामुळे यापूर्वीचे 2014 मधील 103 कोटी 28 लाख,2015 मधील 61 कोटी 47 लाख,2016 मधील 87 कोटी 82 लाख,2017 मधील 93 कोटी 54 लाख,2018 मधील 80 कोटी 28 लाख,2019 मधील 76 कोटी 95 लाख,2020 मधील 70 कोटी 90 लाख हे वसुलीचे रेकॉर्ड मोडीत निघाले असून ते इतिहासजमा झाले आहेत.