ठाणे : कोलशेत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे ग्रँड सेंट्रल पार्क साकारण्यात आले असून अनेकविध नवीन उपक्रम या पार्कमध्ये ठाणेकरांना अनुभवयास मिळणार आहेत. शहरातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ठाणे शहरातील हेरिटेज ट्री व दुर्मिळ वृक्ष यांची माहिती व्हावी यासाठी ‘स्पीकिंग ट्री’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या ठाणे ग्रँड सेंट्रलपार्कचे लोकार्पण येत्या गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पीकिंग ट्री म्हणजे सेंट्रल पार्कमधील 10 हेरिटेज ट्री (50 वर्षावरील) व दुर्मिळ वृक्षांवर व्हिडीओ क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. सदर क्यू आर कोड स्मार्ट फोनद्वारे स्कॅन केल्यानंतर त्या झाडांची माहिती देणारा व्हिडीओ सादर होईल व झाड जणू प्रत्यक्षात आपल्याशीच बोलत आहे याची अनुभूती नागरिकांना अनुभवता येईल.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पतरू या विकासकाने ठाणे ग्रँड सेंट्रल पार्क विकसित केले आहे. सेंट्रल पार्कमधील वड, बारतोंडी, भोकर, जांभूळ, कडूनिंब, कापूर, शिरीष, ताम्हण, करंज व कैलासपती इत्यादी वृक्षांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने सेंट्रलपार्कमधील इतर वृक्षांवर सुद्धा क्यू आर कोड लावण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक वृक्षांची माहिती इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये नागरिकांना वाचायला मिळणार असल्याची माहिती उपायुक्त (उद्याने) मिताली संचेती यांनी दिली.
स्पीकिंग ट्रीच्या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना हेरिटेज ट्री व दुर्मिळ वृक्षांची माहिती मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे. तसेच वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व पटवून देण्यासाठी दर रविवारी हेरिटेज ट्री टेल आयोजित करण्यात येणार आहे. या ट्रेलसाठी एकूण 10 ठिकाणांवरील 23 वृक्ष निवडली जाणार असून सदर वृक्षांनाही क्यू आर कोड बसविण्यात येत आहेत.
लोकार्पणानंतर ठाणेकरांनी या ठाणे ग्रँड सेंट्रलपार्कला भेट द्यावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
ग्रॅण्ड सेंट्रल पार्कची वैशिष्टये
* न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा
* 3500 पेक्षा जास्त झाडे
* उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा अधिक जातींचा अधिवास आहे.
* मोरोक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्याने
* सर्वात मोठी खुली आणि हरित जागा