ठाणे : महापालिकेच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता मतदारांमध्ये देखील काहीशी भर पडणार असल्याचे दिसत आहे. सध्या महापालिका हद्दीत १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले असल्याची माहिती पुढे आली आहे. तर निवडणुका आणखी पुढे गेल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार सध्या १३ लाख ४६ हजार मतदारांची नोंद पालिकेकडे झाली असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. तसेच लोकसंख्येची गणना देखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच प्रभागांची रचना करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी म्हणजेच घोडबंदर, कळवा, दिवा आदी भाग हे मागील काही वर्षात वाढले आहेत. त्यामुळे या भागातील काही प्रभाग हे मोठे झाल्याचे दिसत आहेत. परंतु भविष्यात पुन्हा लोकसंख्येची गणना झाल्यानंतर हे प्रभाग छोटे होऊन प्रभागांच्या संख्येत वाढ होईल असे दिसत आहे. परंतु सध्या मात्र तसे काही चित्र दसणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नवे तब्बल १ लाख १७ हजार मतदारांची वाढ झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा आकडा १३ लाख ४६ हजार इतका झाला आहे. मतदार वाढल्याने निश्चितच राजकीय पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिका हद्दीत १८ लाख ४१ हजार ४८१ इतकी लोकसंख्या नोंदवली गेली होती. तर आता ती लोकसंख्या तीस लाखांच्या आसपास पोहोचली आहे. २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०२ इतक्या मतदारांची नोंद होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ५०४ तर ५ लाख ६१ हजार ८७ इतक्या महिला मतदारांसह अवघे १५ अन्य मतदारांचा समावेश होता.
यंदाही मतदान नोंदणी मोठया प्रमाणात झाल्याचे दिसून आले. यामध्ये नव्याने नावे नोंदविणाऱ्यांच्या संख्येबरोबर १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे नव्या मतदारांची संख्या १ लाख १७ हजार ३९४ इतकी महापालिका कार्यक्षेत्रात वाढली आहे. या वाढत्या मतदार संख्येमुळे सदस्य संख्या वाढली आणि प्रभागही वाढले आहेत. या वाढत्या मतदारांमुळे राजकीय पक्षामधील नेतेमंडळींना निश्चित घाम फुटणार असल्याचे आता दिसू लागले आहे.