थेट आमदाराच्या खिशातून उडवले पाऊण लाख

अंबरनाथ: भाजपा-शिवसेनेचे युतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्यानंतर जल्लोष सुरू असतानाच गर्दीचा फायदा घेत पाकीटमाराने  विजयी उमेदवाराच्या खिशावर डल्ला मारून 75 हजार रुपये पळवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या प्रकरणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार केली आहे. गुरुवारी नेरूळ येथील मतदान मोजणी केंद्रावर ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय जल्लोष साजरा केला जात होता. या जल्लोषात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने या गर्दीचा फायदा घेत पाकीटमाराने अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी यांची पाकिटे लंपास केली. काही कार्यकर्त्यांचे मोबाईलही या चोरट्याने लंपास केले.

या चोरट्याने आमदार म्हात्रे यांच्या  खिशातच हात घातला. म्हात्रे यांनी पुढच्या खिशात असलेले 50 हजार रुपये आणि मागच्या पर्समध्ये असलेले 25 हजार रुपये अशा एकूण 75 हजारावर डल्ला या चोरट्याने मारला.

पाकीट मारले गेल्याचे आ. म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसोबत पाकीटमार देखील सहभागी झाल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राजकीय पुढार्‍यांच्या जल्लोष रॅलीमध्ये पाकीटमार आपली हातसफाई दाखवत असल्याच्या घटना या आधी देखील घडल्या आहेत.