कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केल्याने मोहने येथील लहुजी नगर या वसाहतीत शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टॅंकमध्ये कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गेलेली गर्भवती महिला या दुर्घटनेत जखमी झाली आहे.
मोहने येथील लहुजी नगर येथे सुमारे २७ वर्षांपूर्वी महानगरपालिकेने पुरुष आणि महिला वर्गांसाठी प्रत्येकी चार सार्वजनिक शौचालय बांधले होते. शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीकरिता वारंवार निधी उपलब्ध करूनही ठेकेदार वरच्यावर मलमपट्टी करून पालिकेकडून दुरुस्तीचे बिल उकळत होते. या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कडी कोयंडे, दरवाजे नसल्याचे दिसून येत आहे.
सकाळच्या सुमारास उमा रिठे (२२) ही गर्भवती महिला साडेसहाच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गेली असता शौचालयाच्या भांड्यासह भाग कोसळून महिला सेफ्टी टॅंकमध्ये पडली. महिलेने कसेबसे स्वतःला सावरत सेफ्टी टॅंकमधून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ती गाळात रुतल्याने तिला बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले. याच दरम्यान तिने आपला जीव वाचवण्याकरता मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात करू लागली.
शौचालयाच्या नजीक राहत असणाऱ्या एका नागरिकाने तिचा आवाज ऐकल्याने घटनास्थळी जात सेफ्टी टॅंकमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला मोठ्या शिताफीने बाहेर काढत गर्भवती महिलेस जीवदान दिले. मात्र या दुर्घटनेत गर्भवती महिलेस इजा झाली असून तिला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संदर्भात मनपाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याशी संपर्क साधला असता आपण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवत असल्याचे सांगितले. याबाबत लहुजी शक्ती सेनेचे कल्याण तालुका युवा अध्यक्ष श्रावण बनसोडे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असून शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.