आरोपीस घेऊन जाणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की; चौघांवर गुन्हा

भिवंडी : तालुक्यातील पुर्णा गावात आरोपीस घेऊन जाणाऱ्या पोलिसाला सेंटर पॉईंट हॉटेलजवळ धक्काबुक्की केल्याने चार जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल सोमवारी रात्री घडली आहे.

पुर्णा गावातील महिलेची छेड काढल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपी संजय वाडेकर यास पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पोलीस हवालदार नाना मुरलीधर रायते यांना दीपेश इताडकर याने शिवीगाळी करीत खाकी गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि नेमप्लेट तोडली.

घटनास्थळी महेश, आशिष भगत आणि तीन अनोळखी इसमांनी छातीवर मारून धक्काबुक्की करीत धाकाने आरोपी संजय वाडेकर यास पोलीस ठाण्यात नेण्यापासून अडथळा करून सरकारी कर्तव्यापासून परावृत्त केले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी विकास राऊत हे करीत आहेत.