पोलिसाला चाकूचा धाक दाखवला; मुंब्रा पोलिसांनी काढली धिंड

ठाणे: नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोइंग करून उचलल्याचा राग आल्याने दोघा तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चाकू दाखवून धमकी दिल्याची घटना शनिवारी मुंब्र्यात घडली होती. या घटनेतील दोन्ही आरोपींना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांनी ज्या परिसरात दहशत पसरवली होती त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली.

शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास मुंब्र्यातील रेल्वे स्टेशन परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. वाहतूक शाखेच्या मुंब्रा उपविभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अशोक देशमुख हे टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांसोबत ही कारवाई करीत असतांना नो पार्किंगमध्ये उभी असलेली एक स्कुटी उद्घोषणा करून देखील कुणीही न हटवल्याने टोइंग कर्मचाऱ्यांनी ती उचलून जमा केली. त्याचवेळी काही अंतरावर गेल्यावर दोघे तरुण टोइंग व्हॅनजवळ आले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर फरशीने टोइंग व्हॅनची काच देखील फोडली. वाहतूक पोलीस देशमुख व टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी या दोघा तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्याच्याकडील चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकू हवेत फिरवून व शिवीगाळ करून मारहाण करीत परिसरात दहशत माजवली.

या प्रकरणी वाहतूक पोलीस हवालदार देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दानिश शेख आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे, दहशत माजवणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.

अटक आरोपी स्वतःला गुंड समजून दहशत परसवीत असल्याने पोलिसांनी आज शुक्रवारी या दोघा आरोपींची मुंब्रा शहरातून धिंड काढली व नागरिकांनी अशा गुंडांच्या दहशतीला अजिबात भयभीत होऊ नये असे आवाहन केले. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.