अंबरनाथ: शहरात दैनंदिन कचरा उचलून नेणाऱ्या ठेकेदाराला सात महिन्यांचे बिल न दिल्याने त्याने कचरा उचलून नेला नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे आढळून येत आहे.
शहरात आज सकाळपासून कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने तब्बल सात महिने बिलाचे पैसे अदा केले नाहीत. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्यासाठी प्रशासनाने एका कंपनीची नेमणूक केली होती. मात्र ऑगस्टपासून फेब्रुवारी अखेर या कंपनीला नगरपालिकेने बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक गणितही कोलमडल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधिक कंत्राटदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी घंटागाडी न चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंबरनाथ शहरातील कचरा उचलला गेला नाही.
याबाबत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धावाधाव करत या कर्मचाऱ्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सहा महिने वेतन मिळाले नाही तर काम कसे करायचे असे सफाई कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. तर सहा महिने आर्थिक गरजा कशा भागवायच्या असा प्रश्न कंत्राटदाराने उपस्थित केला आहे. बिल रखडल्यामुळे कामगारांचे पगार, गाड्यांचा खर्च हे सगळे आता आवाक्याबाहेर गेल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.