मासे पकडण्यासाठी गेलेली व्यक्ती नाल्यात बेपत्ता

ठाणे : मासे पकडण्यास गेलेला 32 वर्षीय व्यक्ती नाल्यातील वाहत्या पाण्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी सकाळी कळव्यात समोर आली. दोसा असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो कळवा शांतीनगर परिसरातील राहणारा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिवमंदिरजवळ, साईनाथ नगर, महात्मा फुले नगर, कळवा या ठिकाणी दोसा नामक एक व्यक्ती मित्रासोबत रेतीबंदर खाडी किनारी असणाऱ्या नाल्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हा व्यक्ती नाल्यामध्ये पडला व वाहून गेला.

घटनास्थळी कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेऊन सुमारे तीन तास शोधकार्य राबवले. मात्र, पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती मिळून आला नाही. मुसळधार पाऊस असल्याने नाल्याला पाण्याचा प्रवाह मोठा प्रमाणात असल्यामुळे दुपारी हे शोधकार्य थांबविण्यात आले.