सुरु होतोय अरुंधतीचा नवा प्रवास…

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते अत्यंत मह्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अरुंधतीने कुटुंबासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तिच्या वाट्याला मात्र नेहमी संघर्षच आला. अनिरुद्धकडून झालेली फसवणूक, २५ वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट, घटस्फोट आणि आशुतोषसोबत लग्न करुन नव्याने संसार थाटण्याचा घेतलेला निर्णय. अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सुख-दु:खाचे क्षण आले. मात्र अरुंधती परिस्थितीसमोर कधीही हतबल झाली नाही. दु:ख मागे सारून ती प्रत्येक प्रसंगाशी ताठ मानेने लढली.

आशुतोषसोबत नव्याने आयुष्य सुरु करुन सुखाचे क्षण अनुभवत असतानाच पुन्हा एकदा नियती अरुंधतीची परिक्षा घेणार आहे. सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानक एका अपघातात आशुतोषचं निधन होणार आहे. अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. या कठीण प्रसंगात अरुंधतीच्या पाठीशी आईच्या मायेने ठामपणे उभी रहाणार आहे अरुंधतीची सासू अर्थात कांचन. सासू कधीच आईची जागा घेऊ शकत नाही असं म्हण्टलं जात. मात्र कांचनने उचललेलं पाऊल समाजातील अनेक अरुंधतींना नक्कीच नवी उभारी देईल. कांचनच्या साथीने अरुंधती या कठीण प्रसंगाचा सामना कसा करणारा याचा प्रवास आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. तेव्हा पाहायला विसरु नका आई कुठे काय करते १८ मार्चपासून दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.