सर्वाधिक २३१३ दुचाकी, ७४९ चारचाकीचा समावेश
ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात मंगळवारी १०५ वाहनांची खरेदी झाली. यामध्ये ८४ दुचाकी तर २१ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत ३४०६ वाहनांची खरेदी झाली असून, यामध्ये सर्वाधिक २३१३ दुचाकींचा समावेश असल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिक काही दिवसांपूर्वीच आगाऊ बुकिंग करतात. या वाहनांची ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद होते. त्यांनतर ग्राहक मुहूर्तावर आपली वाहने घरी घेऊन जात असतात. त्यामुळे १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ४०६ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २ हजार ३१३ दुचाकी तर, ७९४ कारची संख्या आहे.
मंगळवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेक जण मनोभावे आपल्या वाहनाची पूजा करून वाहन घरी नेताना दिसले. नवीन खरेदी केलेल्या वाहनासोबतचा फोटोसुद्धा अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. अनेकांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच आपले वाहन घरी नेले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने ठाणेकर मंगळवारी आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत असणार, हे जाणून ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून विशेष परिश्रम घेण्यात आले.
वाहन खरेदी (१ ते ९ एप्रिल)
वाहन प्रकार खरेदी वाहने
दुचाकी २३१३
चारचाकी ७४९
रिक्षा ६४
कॅब २०
मालवाहू २२२
बस ६
इतर २१४
एकूण ३४०६