ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजे ठाणे, कशेळी, भिवंडी येथे मुंबई मेट्रोच्या मार्गिका पाचसाठी मेट्रो खांबांचे बांधकाम करणार आहे. यासाठी 0.6983 हेक्टर कांदळवन क्षेत्रात काम करण्यासाठी केंद्र शासनाची तत्वत: मान्यता प्राप्त झाली आहे. 26 मे 2023 च्या पत्रामुळे या कामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
मुंबई मेट्रो चारची आणि मेट्रो पाचची सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यास सन २०३१ मध्ये किमान १५ लाखांपेक्षा प्रवाशांना ही सुविधा दररोज वापरता येणार आहे, असे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
एमएमआरडीएने डिसेंबर 17 पर्यंत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले होते आणि भिवंडीतील काही दुकानदार व रहिवाशांच्या निषेधामुळे सर्वेक्षण कामात अडथळा निर्माण झाला होता.
संबंधित प्रस्तावाच्या अंतर्गत कांदळवन क्षेत्रात काम करण्यासाठी आणि वृक्षतोडीसाठी ठाणे येथील मुख्य वन संरक्षक (प्रा) यांच्याकडूनही 15 फेब्रुवारी 2024 अन्वये काही अटींच्या अधीन राहून परवानगी प्राप्त झाली आहे. या क्षेत्राची माहिती एमएमआरडीएकडे आहे.
भिवंडी तालुका येथील कशेळी गावातील सर्व्हे क्र. सीटीएस क्रमांक 194 येथे खाडी असून त्याचा वैधानिक दर्जा राखीव वन आणि कांदळवन असा आहे. राखीव वनाचे क्षेत्र हेक्टर 0. 3771 असे आहे आणि कांदळवनचे क्षेत्र हेक्टर 0.3212 असे असून एकूण क्षेत्रात 0.6983 असे आहे.
मार्गिका पाच मुंबई मेट्रो किंवा ठाणे, भिवंडी, कल्याण लाईन ही मुंबई शहरातील मेट्रो प्रणालीचा भाग आहे.ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे
तब्बल 24.9 किलोमीटर लांबीच्या ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो पाच मार्गावर केवळ 17 स्थानके असणार आहेत आणि त्यासाठी तब्बल 8616 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असणार आहे. आणि ठाणे पूर्व उपनगरातील भिवंडी आणि कल्याणला जोडणार आहे.
ठाणे पश्चिम, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजुर फाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाळ नगर, टेमघर, राजनोली गाव, गोवेगाव, एमआयडीसी, कोनगाव, दुर्गाडी किल्ला, सहानंद चौक आणि कल्याण रेल्वे स्टेशन या स्थानकांमध्ये कापूरबावडीचा समावेश झाला आहे. या मार्गिकेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 24 ऑक्टोबर 2017 रोजी मान्यता देण्यात आली होती.
कल्याण एपीएमसी हे स्थानक मार्ग क्रमांक १२ मुंबई मेट्रोमध्ये सहभाग झाले आहे. या मार्गिकेत आधारवाडी मार्ग, मोहेंद्रसिंग कांबळ सिंग मार्ग, काळा तलाव मार्ग, संतोषी माता मार्ग आहे. या उन्नत मार्गाची लांबी 24.9 किलोमीटर अपेक्षित आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो लाईनची नियोजित पूर्णतेची तारीख 2025 आहे.