* चाकूने ३५ वार करून मृतदेह गोवेलीच्या जंगलात फेकला
* कल्याण ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा
कल्याण : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराने मित्राच्या संगनमताने केलेल्या खुनाचा टिटवाळा पोलिसांनी ४८ तासाच्या आत छडा लावत आरोपीला अटक केल्याची माहिती कल्याण ग्रामीण पोलिसांनी दिली.
कल्याण तालुका पोलीस स्टेशन, हद्दीत रेवती गावाच्या जंगलात एका अनोळखी महिलेचे प्रेत संपुर्ण कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याबाबत २७ डिसेंबरला कल्याण तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्याच्या अनुषंगाने कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे कल्याण तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने गुन्ह्यामधील अनोळखी मयत महिला वारसाचा व अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला.
लातूर जिल्ह्यातील रुपांजली जाधव (२३) या नावाचे आधारकार्ड मिळून आले होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता त्यांना रूपांजली जाधव ही लातुर येथून कामाला जाते असे सांगुन गेली होती तेव्हापासून तिचा मोबाईल बंद असल्याची माहिती समोर आली. तिच्या नावावरून फेसबुक, इन्स्टाग्राम या अॅप्सवर जाऊन तिच्या मित्रांचे, नातेवाईकांचे फोटो आणि माहिती प्राप्त केली. तसेच तिच्या नातेवाईकांनी मयतास व तिचे कपडे, बुट, पाहून ती रुपांजली असल्याची खात्री संभाजी जाधव यांना झाली. मयत महिलेला दोन मुली व एक मुलगा असून ती पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर प्राप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करता रुपांजली जाधव ही चाकण एमआयडीसी, पुणे येथे राहण्यास आली असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने त्या परिसरात शोध घेत असतांना मयत रूपांजली ही जयराम चौरे याच्या सोबत राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. जयराम चौरे (१८) आणि त्याचा मित्र सुरज धोटे (२०) या दोघांना एमआयडीसी चाकण, पुणे या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जयराम आणि मयत रूपांजली दोघे एकञ राहत होते. रुपांजली ही जयराम यास तिच्यासोबत लग्न करण्यास सांगत होती. परंतु जयराम लग्न करण्यास तयार नव्हता, म्हणून जयराम याने त्याचा मित्र सुरज थोटे याच्याशी संगनमत करून रुपांजली हिला मारुन टाकण्याचे ठरवले. १२ डिसेंबर २०२२ रोजी जयराम आणि त्याचा मित्र सुरज या दोघांनी रुपांजलीला एका दुचाकीवरुन चाकण पुणे येथून लोणावळा, खोपोली, कर्जत, बदलापुरमार्गे गोवेली रेवती गावच्या जंगलात आणून चाकूने पोटात, पाठीत भोसकून तसेच गळा चिरून तिचा निर्घृण खुन केला असल्याचे तपासात निष्पण्ण झाले असल्याची माहिती कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्थानकाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.