विवाहितेने चिमुरडीसह घेतली सहाव्या मजल्यावरून उडी

बहिणीला भेटण्यास जाऊ दिले नाही म्हणून…

ठाणे : सासरच्या मंडळींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला सातारा येथे भेटण्यास जाऊ दिले नाही म्हणून रागाच्या भरात 26 वर्षीय विवाहितेने आपल्या एक वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ठाण्यात घडली.

प्रियंका मोहिते असे या घटनेत मृत झालेल्या विवाहितेचे नाव असून ध्रुवी ही एक वर्षाची चिमुरडी देखील या घटनेत मयत झाली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथील जॉय स्क्वेअर या इमारतीच्या सहाव्या माळ्यावर राहणारे मोहिते कुटुंबात रक्षाबंधांच्या दिवशी किरकोळ घरगुती वाद झाला होता. यावेळी प्रियांका हिने तिच्या सातारा येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला जाण्यास विरोध केला. याच गोष्टीचा राग मनात धरून प्रियांकाने 1 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आपल्या एक वर्षीय मुलगी ध्रुवी हिला सोबत घेऊन सहाव्या माळ्यावरून उडी घेतली. यावेळी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.