बदलापूर: बदलापूरच्या पूर्व भागातील मानकिवली एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा आगीच्या घटनेने हादरला असून इको नीट प्रोसेसर या कापड (डाईंग) प्रक्रियेच्या कंपनीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन सूत्रांनी सांगितले.
कंपनीला आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी तत्काळ बाहेर पडत बचाव केला. सुरुवातीला काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त होत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि काही मिनिटांतच अग्निशमन अधिकारी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शैलेश जगताप यांच्यासह १८ जवानांच्या पथकासह पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
आग लागलेल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कापडसाठा असल्याने आग भडकली. परिसरात रासायनिक ड्रम असल्याने आगीचा भडका आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाने वेळीच परिस्थितीचा अंदाज घेत पाण्याचा मारा आणि आवश्यक उपाययोजना राबवत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या आगीमागे नेमके कारण काय याचा शोध सुरू आहे. आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.