ठाणेवैभव आणि ‘निरुपाज्’ महिला सोहळा यशस्वी
ठाणे: महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला निरुपाज् महिला सांस्कृतिक आणि सत्कार सोहळा मंगळवार, १४ एप्रिल रोजी ठाणे येथील आदारा हॉल, द ठाणे क्लबमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी ४:३० ते ७ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात डॉ. ज्ञानदा बांदोडकर, डॉ. श्वेता राव वारके, डॉ. अल्पना वैद्य, डॉ. मिताली वैद्य आणि शर्मिला माडीवाले यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच निरुपाज् साडीच्या संचालिका निरुपा तायडे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन साधना जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजात आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. संगीत, नृत्य आणि विविध कलात्मक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या सोहळ्यात लायन्स क्लबच्या विविध शाखांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे सेंट्रल, लायन्स क्लब ऑफ ठाणे अर्बन, लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी, लायन्स क्लब ऑफ ठाणे वेस्ट, लायन्स क्लब ऑफ ठाणे गॅलेक्सी, लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड, लायन्स क्लब ऑफ ठाणे अमारा, लायन्स क्लब ऑफ ठाणे रॉयल्स, लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, लायन्स क्लब ऑफ ठाणे पोखरण, लायनेस क्लब ऑफ ठाणे कोपरी तसेच नीमा वूमन्स फोरम, ठाणे यांचा समावेश होता.
यावेळी निखिल बल्लाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येथे उपस्थित असलेली प्रत्येक महिला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये सांभाळून छंद जोपासत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.” त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि संस्थांचे आभारही व्यक्त केले. मिलिन्द बल्लाळ यांनी ‘निरुपाज्’च्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “ठाण्यातील ग्राहक चोखंदळ असल्यामुळे ‘निरुपाज्’ला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल. महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी लायन्स क्लबच्या महिलांसाठीच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. निरुपा तायडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा नेहमीच होती आणि ‘ठाणेवैभव’च्या माध्यमातून ती संधी मिळाली.” त्यांनी पुढे सांगितले की, अल्पावधीतच ‘निरुपाज्’ला ठाणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच परदेशातूनही साड्यांना मागणी वाढत असून अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, दुबई, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथूनही ग्राहक जोडले गेले आहेत. लवकरच पुण्यात भव्य दालन सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी असे प्रेरणादायी आणि सन्मानाचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद वाटतो. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नक्कीच बळ मिळते. आजचा हा सुंदर सोहळा यशस्वी केल्याबद्दल द ठाणे क्लबच्या निकेता शर्मा यांनी सर्व आयोजकांचे तसेच उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.
महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने समाजात सकारात्मक संदेश दिला असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.