* नैसर्गिक प्रवाह बुजवून बेकायदा इमले
* कांदळवन, महापालिका, जिल्हा, पोलीस प्रशासन निद्रिस्त
ठाणे: बेकायदा इमारती आणि चाळींमुळे बदनाम झालेल्या दिव्यात थेट खाडीपात्रात माती भरावाने नैसर्गिक प्रवाह बुजले गेल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दिवा गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिवा पश्चिमेच्या खाडीकिनारी उग्रेश्वर मंदिराजवळ असलेल्या गणेश घाट येथे गेल्या वर्षभरापासून अनधिकृतरित्या भरणी सुरू आहे. खारफुटीची बेसुमार कत्तल करून आणि संबंधित भूखंडाला भिंत उभारण्यात आली आहे. खाडीचे नैसर्गिक प्रवाह भूमाफियांनी या ठिकाणी बुजवले असून भविष्यात टोलेजंग इमारती, चाळी उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात दिवागाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे स्थानिक गावकरी भयभीत झाले असून भविष्यात दिव्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या अतिक्रमणाकडे ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारीही जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत दिव्यात अनधिकृत चाळी आणि तीन ते चार मजली बेकायदा इमारती न उभारता थेट बहुमजली टॉवर उभारण्याचा पॅटर्न सुरु झाला आहे. अशाच प्रकारे दिवा पश्चिमेच्या मातोश्री नगर भागात खाडीपात्रात भरणी करुन सात मजली इमारती भूमाफियांनी उभ्या केल्या असून दिवा गावातील भूमाफियांचे अतिक्रमण ‘ड्रोन चित्रीकरणा’तून भयावहरित्या समोर आले आहे.
एकीकडे विधिमंडळ अधिवेशनात दोनच दिवसांपूर्वी दिव्यालगतच्या शीळ, खर्डी, महापे रोड, खान कंपाउंडमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र तरीही दिव्यात भूमाफियांकडून विनापरवानगी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात ‘लकी कंपाउंड’ इमारत दुर्घटनेप्रमाणेच इमारत कोसळून निष्पाप नागरिकांचे प्राण गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.