ठाणे: जुने बांधकाम असलेल्या इमारतीच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग पडून मुस्कान शेख ही नऊ वर्षीय चिमुरडी जखमी झाली असून तिला ठाणे महापालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
ही घटना सोमवारी मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मुंब्र्यातील संजय नगर येथे घडली. सद्यस्थितीत तिची प्रकृती स्थिर असल्याने रुग्णालयातून तिला घरी सोडण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मुंब्रा संजय नगर येथे अंदाजे १५ ते २० वर्षे जुने बांधकाम केलेली तळ अधिक सात मजली म्हात्रे अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम नं. ४०६ हा अफसाना बानू यांच्या मालकीचा असून तो रूम त्यांनी हनीफ शेख यांना भाड्याने दिला आहे. त्या रूममधील छताच्या प्लास्टरचा काही भाग मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पडला. त्यावेळी हे कुटुंब झोपले होते. त्या घटनेत मुस्कान ही जखमी झाली असून तिच्या डोक्याला तसेच डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून तिच्या पालकांनी तिला उपचाराकरिता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल केले होते. त्यानंतर रुग्णालयातून या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली.
याबाबत संबंधित विभागाला माहिती कळविण्यात आली असून, संबंधितांना कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.