ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विरोधात खोटा गुन्हा रचल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशिद यांनी केला आहे. आव्हाड यांच्याविरोधात यापूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधात खोट्या गुन्ह्याचा कट रचला असल्याचे रिदा रशीद यांचे म्हणणे आहे.
आव्हाड यांच्यासह २३ जणांची नावे त्यांनी मुंब्रा पोलिसांना दिली असून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे जाहीर पत्रकार परिषद घेऊन केली आहे. मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडला होता. या सोहळ्या दरम्यान आव्हाडांनी भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशिद यांना दोन्ही हातांनी पकडुन बाजुला हटवले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्यांना गर्दीतून बाजूला केले असल्याचे त्यावेळी आव्हाड यांनी स्पष्ट केले होते. मात्र रिदा रशिद यांनी आव्हाडांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या विरोधात खोट्या गुन्ह्यांचा कट रचला होता असा आरोप रिदा रशीद यांनी गुरुवारी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
यासंदर्भात त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब दिला असून यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह २३ जण खोटा गुन्हा रचण्याच्या कटात समिती असल्याचे रिदा रशीद यांनी म्हंटले आहे.
दरम्यान पत्रकार परिषदेत रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयाला एक चौकशी अहवाल सादर केल्याचे कागदपत्र सादर केले असून यामध्ये आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच त्यांचा बदला घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
“मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या जुन्याच गुन्ह्यामध्ये पुरवणी जबाब घेताना काही आरोपींची नावे वाढली आहेत. यासंदर्भात तपास अजून सुरु असून तपास पूर्ण व्हायला दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत रिदा रशीद यांनी काय कागदपत्रे सादर केली याबाबत मला काही माहिती नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.