२१ कोटींचा निधी मंजूर, कामाला सुरुवात
ठाणे: ओवळा-माजिवडे विधानसभा मतदारसंघात आदिवासी पाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथील आदिवासी कुटुंबातील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी भाईंदर पाडा येथे वसतिगृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत पाठपुरावा केला. शासनाने या कामी २१ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून भाइर्दर येथील मुन्शी कंपाऊंड येथे १५० क्षमता असलेले आदिवासी मुलांचे वसतिगृह बांधण्यात आले असून त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील राज्य शासनाने १५० क्षमता असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाकरिता सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये मान्यता देऊनही जागेची आवश्यकता असल्याने या कामाला गती मिळत नव्हती. त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने भाईंदरपाडा येथील लोढा उद्योग समुहाचा सुमारे २२०० चौ.मी.चा सुविधा भुखंड ठाणे महानगरपालिकेने रेडी रेकनरच्या दराने घेऊन आदिवासी विभागाकडे सुपुर्त केल्यामुळे जागेचा प्रश्न निकाली काढला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत वसतिगृहाचे बांधकाम होणार असल्याने ठाणे महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याचे देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले असून लवकरच कामाला सुरूवात होईल असे श्री. सरनाईक यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील भाईंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा कॉम्प्लेक्समध्ये आदिवासी विभागातर्फे आदेश क्रं. आवगृ१३१९/प्र.क्रं.१७/का.०५ दि. २१ जानेवारी, २०२१ अन्वये आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधण्याकरिता शासनाची मान्यता देण्यात आली असून त्यासाठी सन २०१७-१८ च्या दरचुनीनुसार २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सदरहू वसतिगृहाची इमारत तळ+सहा मजल्याची असून इमारतीचे क्षेत्रफळ ४४८२.७५ चौ.मी. आहे. सदरहू इमारतीच्या तळमजल्याला स्वयंपाकगृह, भोजन कक्ष व भांडारगृह बांधण्यात येणार असून पहिला मजला ते सहाव्या मजल्यापर्यंत मुलींना राहण्याकरिता खोल्या, प्रसाधन गृह, सभागृह व अधिक्षिका निवासस्थान असणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात होणारे पहिले आदिवासी मुलींचे वसतिगृह असून त्यामुळे आदिवासी मुला-मुलींचे शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले.भाइर्दरपाड्यात आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह उभारणार