शहापूर : खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शहापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याची लागवड करून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. यावर्षी शहापूर तालुक्यातील किन्हवली भागातील कानवे येथील उच्चशिक्षित डी.एड.शेतकरी महिला दिव्या निमसे हिने आपल्या घरालगत असलेल्या अवघ्या ३० गुंठे शेतीमध्ये माहिको कंपनीचे रिता या वाणाचे भेंडी लागवड करून त्यामधून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी लागवड केलेल्या भेंडीची पाहणी केली. याशिवाय माहिको सीड कंपनीचे ठाणे, पालघर, रायगड विभागीय व्यवस्थापक धर्मेंद्र तिवारी आणि बेडीसगाव येथील शेतकरी सल्लागार किसन विशे यांनी प्रत्यक्ष भेंडी लागवडीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्लॉटची पाहणी करून त्यांचा विशेष सन्मान केला आहे. याशिवाय दिव्या हिने भेंडी लागवड करून उर्वरित भूखंडामध्ये रोज लागणारा भाजीपाला वांगी, मिरची, टोमॅटो, मूग, कोबी, फ्लॉवर अशा विविध भाजीपाल्याची दैनंदिन गरज भागवण्यासाठी या ठिकाणी परसबाग तयार केली आहे.
दिव्या निमसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील शेतकरी बांधव कौतुक करीत आहेत. आजतागायत भेंडीचे २० तोडे झाले असून त्यापासून जवळपास ५० हजार इतके आर्थिक उत्पन्न दिव्या यांना मिळाले आहे. या भेंडी लागवडीमधून यापुढे लाखाहून अधिक उत्पन्न मिळेल असे तिने प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
लागवड, मशागत, बियाणे, औषधे असा एकूण ३० गुंठ्यासाठी त्यांना ३० ते ३५ हजार रुपये भांडवल गुंतवावे लागले आहे. यासाठी त्यांचे पती दिनेश निमसे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. भेंडी प्लॉट उभारण्यासाठी त्यांना प्रतीक्षा भेरे, अनिता बांगर, सुजाता निमसे, जागृती भावार्थे, दीपक घोडविंदे, हिरानाथ बांगर, अरुण भेरे, हरीश भेरे, सुरेश घोडविंदे या शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
महिला शेतकऱ्याने केलेला हा यशस्वी उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून तेवढाच कौतुकास्पद आहे.