उत्तरप्रदेशमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

मीरा-भाईंदरमध्ये झाले हिंदी भाषा भवनाचे भूमिपूजन

भाईंदर : हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उत्तर प्रदेश राज्यातील मोठ्या शहरात उभारण्यात येईल. तसेच उत्तर प्रदेशातील तीर्थक्षेत्री महाराष्ट्रातून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशात ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू , अशी घोषणा उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर बोलताना केली. मीरा रोड येथे उभारण्यात येणाऱ्या हिंदी भाषा भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मीरा-भाईंदर मनपा हद्दीत घोडबंदर सर्वे क्रमांक २१/१, २४ पैकी या जागेत ज्येष्ठ कविवर्य हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज स्वतंत्र देव सिंग यांच्या हस्ते पार पडला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अथक प्रयत्नांनी हे भवन उभे राहत असून तळ अधिक तीन मजले बांधकाम केले जाणार असून पार्किंग , पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हॉल , तिसऱ्या मजल्यावर कार्यालयासाठी जागा अशा सुविधा भवनात असणार आहेत. या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, उत्तर भारतीय समाजाचे नेते विक्रमप्रताप सिंग, आयुक्त दिलीप ढोले व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.

मीरा-भाईंदरमध्ये सर्व जाती-धर्म आणि सर्व समाजाला, प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन आम्ही विकासकामे केली व करीत आहोत. हिंदी भाषिकांच्या मागण्यांचा विचार करून हे भवन उभे राहत आहे. पुढील दीड वर्षात हे भवन बांधून पूर्ण होईल. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची ही इमारत बांधून तयार होणार असून राज्य सरकारने एक कोटीचा निधी दिला आहे. आम्ही मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषा भवन उभारत आहोत. आता उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशच्या महानगरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच उत्तर प्रदेशातील अयोध्या, काशी अशा तीर्थक्षेत्री दर्शनासाठी जाणाऱ्या मराठी भाविकांसाठी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारावे अशी मागणी आमदार सरनाईक यांनी भाषणात केली. त्यांची मागणी मंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी मान्य केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून नक्कीच तेथे ही कामे केली जातील , असे मंत्री सिंग म्हणाले.

आलेल्या मान्यवरांचे महाराष्ट्र ढोल पथकाने, तुतारी वाजवून स्वागत केले तसेच मान्यवरांना भगवे फेटे घालण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच हास्य कवितांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.