पडघा येथे करागृहासाठी २०० एकर जागा
आनंद कांबळे/ठाणे
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कारागृह शहराच्या बाहेर हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठे पार्क उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
ब्रिटिश काळापासून ठाण्याच्या खाडी किनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येत आहे. सुमारे ५५ एकर भूखंडावर हे कारागृह आहे. त्यामध्ये सुमारे चार हजार कैदी ठेवण्याची सोय आहे, परंतु प्रत्यक्षात तेथे दहा हजारपेक्षा जास्त बंदिवान ठेवण्यात आल्याने हे कारागृह अपुरे पडू लागले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्याने कैदी आणणे आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे २०१६ साली हे कारागृह इतरत्र हलविण्याची मागणी होऊ लागली होती. ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्याला श्री.शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील आठ वर्षे पाठपुरावा करण्यात आला होता.
ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा येथे सुमारे दीडशे ते दोनशे एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे. त्या भूखंडावर सुमारे २० हजारपेक्षा जास्त कैदी सामावून घेईल, असे सर्व सोईसुविधांनी युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठे पार्क कारागृहाच्या जागेवर केले जाणार आहे. त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृतीस्थळ अबाधित ठेऊन हे पार्क तयार केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि ठाणेकरांना मनोरंजनाकरिता मध्यवर्ती ठिकाणी एकही ठिकाण नाही, त्यामुळे जेल शहराबाहेर पाठवून त्या ठिकाणी पार्क बनविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यांनी तत्काळ या प्रस्तावास मंजुरी दिल्यामुळे जेलच्या 55 एकर जागेवर भले मोठे पार्क होणार आहे. त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना जाते. तर ठाणेकरांना विरंगुळ्यासाठी हे भले मोठे पार्क होणार आहे. जेल शहराच्या बाहेर बांधण्यात येईल. त्यासाठी महापालिका किंवा शासन भूखंड घेऊन देईल तसेच चांगले कारागृह बांधून देईल, असे महापालिका आयुक्त श्री. राव म्हणाले.
ठाणे किल्ला ते मध्यवर्ती कारागृह
पोर्तुगीजांनी इ.स.१७३० साली ठाण्याच्या खाडी किनारी ठाण्याचा किल्ला बांधण्यास घेतला. २९ मार्च १७३७ साली मराठ्यांनी ठाणे किल्ला जिंकून घेतला. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत विजयाची नांदी ठरणारा हा ठाण्याचा किल्ला म्हणजे आजचे ठाणे कारागृह. या किल्ल्याचे रूपांतर पुढे इंग्रजांनी कारागृहात केले. याच किल्ल्यात इ.स.१८१६ साली पेशव्यांचा कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हा पहिला राजबंदी होता. पुढे वासुदेव बळवंत फडके, स्वा.विनायक दामोदर सावरकर, साने गुरुजी, जॅक्सनचा खून करून हौतात्म्य पत्करलेले तरुण क्रांतिकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे, हुतात्मा विनायक नारायण देशपांडे अशा शेकडो क्रांतिवीरांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलिदानाने ठाण्याचा किल्ला अर्थात सध्याचे मध्यवर्ती कारागृह पवित्र झाले आहे.
पुरातत्व खात्याने डोळे मिटले?
हल्ली १०० वर्षे जुन्या झाडाला सुद्धा हेरिटेज म्हणून संरक्षण मिळते. दीड दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूलाही पुरातत्व खात्याचे संरक्षण मिळते. ठाणे किल्ला अर्थात ठाणे कारागृह तर आता २९३ वर्षांचे झाले आहे. या किल्ल्याचे केवळ वयच वाढले नाही तर तो भारताच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. क्रांतिकारकांनी येथे कारावास भोगला, फासावर चढले. येथील भिंती आणि दगडांना सुद्धा क्रांतिकारकांचा सहवास लाभला आहे. अशा ऐतिहासिक आणि अभिमान वाटणाऱ्या ठाणे किल्ल्याच्या भिंती पाडून उद्यान उभारण्यास पुरातत्व खात्याची परवानगी कशी असेल? की या खात्यानेच डोळे मिटले की काय असा संतप्त प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.