ठाणे : मुंबईच्या वेशीवर असूनही ‘ठाणेवैभव’ने आपले स्वतंत्र अस्तित्व केवळ टिकवले नाही तर ठाण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून मोठी भूमिकाही बजावली, असे कौतुकोद्गार मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांनी काढले.
‘ठाणेवैभव’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ठाणेवैभव’ आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी श्री.पवार आणि ठाण्याचे सह पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते झाले. श्री.जाधव यांनीही ठाणेवैभव’च्या विधायक पत्रकारितेची प्रशंसा केली. जिल्हा दैनिकातर्फे एवढा सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्याची ही बहुदा पहिली घटना असावी, असेही ते म्हणाले.
पाहुण्यांचे स्वागत करताना ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी प्रस्ताविकात स्पर्धेचा ४८ वर्षांचा इतिहास सांगितला. दोन वर्षांनी या स्पर्धेला ५० वर्षे होतील, परंतु ४८ वर्षांपूर्वी ज्या सेंट्रल मैदानात ही स्पर्धा सुरू झाली, ते आता शतक महोत्सव साजरा करीत आहे. ठाण्याचा क्रीडा विश्वाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सेंट्रल मैदान आणि ठाणेवैभव’ यांचा आवर्जून उल्लेख होईल, असेही ते म्हणाले. यावेळी सेंट्रल मैदान कमिटीचे अध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांनीही ‘ठाणेवैभव’च्या क्रीडा योगदानाची प्रशंसा केली.
स्पर्धेचे समन्वयक प्रल्हाद नाखवा यांनीही जुन्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत ठाणेवैभव’ क्रीडा संपादक जुईली बल्लाळ यांनी केले.